विद्यार्थ्यांनो राष्ट्रकार्यात सहभागी व्हा…

डॉ. विजय जोशी :संत राऊळ महाराज महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न..

⚡कुडाळ ता.२८-: बदलत्या काळाचे भान ठेवा. काळासोबत चालाल तर टिकाल. आज तुम्हाला जी पदवी मिळाली आहे त्याची आहुती समाज यज्ञामध्ये द्या आणि राष्ट्रकार्यात सहभागी व्हा, असे आवाहन मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा माजी डीन डॉ. विजय जोशी यांनी केले. डॉ. विजय जोशी यांच्या हस्ते संत राऊळ महाराज महाविद्यालयातील पदवीप्राप्त विद्यार्थ्याना पदवी वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कामशिप्र मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यलयाचा पदवी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये शनिवारी सकाळी संपन्न झाला. कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि माजी मुख्य सल्लागार राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान तथा सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. डॉ. श्रीधर पवार, तसेच प्रतिभा पाटणकर, श्री. चव्हाण उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ. स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनतर डॉ. विजय जोशी यांचा अरविंद शिरसाट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, चाफ्याच्या फुलांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अरविंद शिरसाट यांचा सत्कार प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केला. प्रा. जांभळे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यांनतर विद्यापीठाच्या प्रथेप्रमाणे पदवी वितरण समारंभाला सुरुवात झाली. महाविद्यलयातुन विविध शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. विजय जोशी यांनी पदवी प्रमाणपत्राचं वितरण केलं.
महाविद्यलयाच्या ज्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी, गौरव नाईक याना गौरविण्यात आलं. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवात पखवाज वादनात सुवर्ण पदकविजेती श्रुतिका मोर्ये, कॉलेजचा ऍथलेटिक्स कोच क्रिस्टीन रॉड्रिक्स तसेच सौ. उत्कर्षा धुरी-गावडे, हर्षदा साळगावकर याना गौरविण्यात आलं. महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी म्हणून साईवेद मालवणकर याचा सत्कार करण्यात आला.
एसआरएम कॉलेजचे प्रीतम प्रभू, ओंकार सामंत, विनय शिरसाट, सिद्धीका सामंत, आणि शर्वाणी कुलकर्णी हे पाच विद्यार्थी यंदा सीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच एनसीसी बेस्ट कॅडेट पुरुष महेंद्र गावडे, स्त्री – निकिता देसाई, एनएसएस बेस व्हॉलेंटियर पुरुष मयुराज वडाचेपाटकर, स्त्री पूर्वा परब, डीएलएलइ बेस्ट व्हॉलेंटीयर पूजा प्रभू, डीएलएलइ बेस्ट स्टुडन्ट मॅनेजर निवेदिता मेस्त्री, डीएलएलइ बेस्ट अचिव्हर सानिया धरणे, नेचर क्लब बेस्ट व्हॉलेंटीयर साक्षी चव्हाण यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. विजय जोशी यांना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. मागच्या पिढी समोरची आव्हाने वेगळी होती. आताच्या पिढी समोरची आव्हाने वेगळी असतील त्यामुळे जो काळासोबत चालेल तोच टिकेल असे अतिशय ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले. आनंद वाटा. जीवनात सकारात्मक राहा. पाय जमिनीवर ठेवा. यशाने हुरळून जाऊ नका. आई वडील शिक्षक यांना विसरू नका, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page