आंबा-काजू बागायतदारांची फसवणूक; भरपाईवरून उपरकरांचा सरकारवर घणाघात…

⚡कणकवली ता.२८-: आंबा व काजू बागायतदारांना जाहीर केलेली भरपाई अत्यंत अपुरी असून सरकारने सरळ फसवणूक केली आहे, अशी तीव्र टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. हेक्टरी आंब्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी असताना विमा भरलेल्यांना केवळ ४२ हजार आणि विमा न भरलेल्यांना २२ हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झाडामागे अवघे २२० रुपये देण्याचा निर्णय म्हणजे बागायतदारांची चेष्टा असल्याचे त्यांनी म्हटले.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले की, यावर्षी आंबा व काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायतदारांनी काढलेल्या मोर्चावेळी पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात सरकार, मुख्यमंत्री आणि पालकमंत्री बागायतदारांना योग्य भरपाई देण्यात अपयशी ठरले आहेत. जाहीर केलेल्या मदतीत कर्जावरील व्याजदेखील भरता येणार नाही, अशी स्थिती आहे.

साडेचार कोटी रुपये खर्च करून एआयच्या माध्यमातून नेमके काय साध्य होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अधिवेशनात या गंभीर प्रश्नावर कोणतीही चर्चा झाली नाही, तसेच मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनीही हा विषय पुढे आणलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याला यंदा हवामान बदल व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अशा अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवरही सत्ताधाऱ्यांनी बागायतदारांना योग्य दिलासा दिला नाही, असे उपरकर म्हणाले.

आंबा बागायतीसाठी मोठा खर्च करावा लागतो. एका कलमासाठी फवारणीवर हजार ते दीड हजार रुपये खर्च येतो, तर मजुरांना महिन्याला किमान १५ हजार रुपये वेतन द्यावे लागते. सहा महिने सातत्याने निगा राखावी लागते. असे असताना केवळ २२० रुपये प्रति झाड भरपाई जाहीर करणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे बागायतदार जे काही निर्णय घेतील, त्यांना आपला पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काजू बागायतदारांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले असून केवळ २५ ते ३० टक्केच पीक आले आहे. अलीकडील पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ, रतांबा आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी योजना जाहीर होत असल्या तरी नवउद्योजकांसमोर अडचणी कायम आहेत. एकूणच सरकार फसव्या घोषणा करत शेतकरी व बागायतदारांची दिशाभूल करत असल्याची टीका उपरकर यांनी केली.

You cannot copy content of this page