कणकवली : तालुक्यातील तळेरे औंदुबरनगर येथील सामाईक मालकीच्या वडिलोपार्जित जमिनीतील सुमारे १८ हजार रुपये किमतीचे सागाचे झाड अज्ञात चोरट्याने तोडून फांद्यांसह चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बाळकृष्ण शांताराम तळेकर (वय ६०, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. गॅलेक्सी हाईट्स, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई, मूळ रा. तळेरे औंदुबरनगर, ता. कणकवली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, तळेरे येथील खाते क्रमांक ४०४ मधील भूमापन व उपविभाग क्रमांक ५०५ या ८.३३ गुंठे क्षेत्रफळाच्या सामाईक वडिलोपार्जित जमिनीत फिर्यादी, त्यांचे भाऊ, बहिणी तसेच चुलत भावंडांचा संयुक्त मालकी हक्क आहे. या जमिनीत साग, आंबा आणि काजूची झाडे आहेत.
दि. २० मे २०२६ रोजी फिर्यादी व त्यांचे भाऊ दौलत तळेकर यांनी संबंधित जमिनीची पाहणी केली असता सर्व झाडे सुस्थितीत होती. त्यानंतर ते मुंबईला परतले. दि. २६ जून रोजी ते पुन्हा गावी आल्यानंतर दि. २७ जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चुलत भाऊ गणेश प्रभाकर तळेकर यांच्यासह जमिनीची पाहणी केली असता, तेथील एक सागाचे झाड मुळाजवळून धारदार हत्याराने तोडून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेतला असता झाडाचे ओंडके अथवा फांद्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने सुमारे १८ हजार रुपये किमतीचे सागाचे झाड चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून दि. २० मे ते २७ जून २०२६ या कालावधीत घडलेल्या या चोरीप्रकरणी अज्ञाताविरुद्ध BNS २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे करीत आहेत.
