खास. नारायण राणे गप्प का..?:हरी खोबरेकर यांचा सवाल..
⚡मालवण ता.२४-: गेले काही वर्षे मत्स्य दुष्काळजन्य परिस्थिती असताना आता डिझेलचे दर वाढल्यामुळे मच्छीमारांसमोर मच्छिमारी व्यवसाय कसा करावा हा प्रश्न पडला आहे, असे असताना येथील खासदार असणारे आणि स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवणारे खासदार नारायण राणे हे डिझेल दरवाढी विरोधात गप्प का आहेत, डिझेल दरवाढी बाबत खास. राणे संसदेत कोणत्या मंत्र्याला भेटल्याचे किंवा पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना भेटल्याचे ऐकीवात नाही, त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधींना मच्छीमारांच्या प्रश्नाचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते, अशी टीका उबाठा शिवसेनेचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
मालवण येथील उबाठा शिवसेना शाखेत पत्रकार परिषद झाली, त्यावेळी हरी खोबरेकर यांच्या समवेत शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नंदू गवंडी, महेश जावकर, उमेश मांजरेकर, सौ. दिपा शिंदे, राजा शंकरदास, चिंतामणी मयेकर, सुप्रिया मडये, रवि तळाशीलकर, हेमंत मोंडकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आज राज्यात भाजप व शिंदे शिवसेनेच्या महायुतीचे सरकार आहे. कोणताही प्रसंग आल्यावर त्याची सर्वप्रथम झळ सर्वसामान्य जनतेला बसते. आज औद्योगिक गॅस सिलेंडर बंद केल्याने हॉटेल व्यवसाय बंद होण्याची वेळ आली आहे, हा महायुतीच्या सरकारचा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात घरातील गॅस बंद होण्याची पाळी येणार आहे. पूर्वीसारखे पुन्हा लाकूड व चुलीवर जीवन जगावे लागेल अशी भीती सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली आहे. त्यातच डिझेलचे दर वाढले असून मच्छीमारांना ज्या सवलतीच्या दरात डिझेल मिळायचे त्यापेक्षाही जास्त दराने आज मच्छीमारांना डिझेल खरेदी करावे लागत आहे. यामुळे मच्छिमार मेटाकुटीला आला आहे. आधीच मत्स्यदुष्काळ स्थितीने मच्छिमार त्रस्त असताना त्यांच्यावर डिझेल दरवाढीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे व्यवसाय कसा करावा या चिंतेत मच्छीमार आहेत. आज मच्छिमार अडचणी असताना या भागाचे खासदार जे स्वतःला कोकणचे भाग्यविधाते म्हणवतात, त्यांचे कार्यकर्तेही त्यांना भाग्यविधाते म्हणतात असे खासदार नारायण राणे हे या प्रश्नी कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाहीत. डिझेल दरवाढी विरोधात ते संसदेत कोणत्याही मंत्र्याला भेटले नाही किंवा संबंधित विभागाला भेटले नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मच्छीमारांचा प्रश्न मांडला नाही. त्यामुळे मच्छीमारांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नसल्याची स्थिती असून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना याबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते, सत्ताधाऱ्यांनी मच्छीमाऱ्यांना वाऱ्यावर सोडले की काय असा प्रश्न पडतो, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
