कणकवली नगरपंचायतीची स्थायी समिती गठीत ; सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व…

⚡कणकवली ता.१७-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशानुसार मंगळवारी झालेल्या कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत अखेर स्थायी समिती गठीत करण्यात आली. या समितीत सत्ताधारी क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षांसह तीन सदस्य, तर भाजपचे दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी विविध विषय समित्या स्थापन करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, त्या वेळी ईश्वरी चिठ्ठीद्वारे विषय समित्या स्थापन न करण्याचा निर्णय झाला होता. तरीही स्थायी समिती स्थापन करण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती. विषय समित्या अस्तित्वात नसल्याने स्थायी समितीसाठी पदसिद्ध सदस्य उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी गटाने आक्षेप घेतला होता. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादही झाला होता.

या पार्श्वभूमीवर पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी निर्णय राखून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार मंगळवारी विशेष सभा घेण्याचे निर्देश देण्यात आले.

प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात झालेल्या या सभेत स्थायी समिती पाच सदस्यांची असेल व नगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतील, अशी घोषणा करण्यात आली. विषय समित्या नसल्यास उपनगराध्यक्ष सदस्य म्हणून राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच सत्ताधारी व विरोधी गटांच्या संख्याबळानुसार सदस्यांची निवड करण्याचे ठरले.

यानुसार क्रांतिकारी विचार पक्षाकडून रुपेश नार्वेकर यांनी स्वतःचे नाव सुचविले, तर भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे यांनी मेघा गांगण यांचे नाव प्रस्तावित केले. उर्वरित एका सदस्यासाठी ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे यांनी काढलेल्या चिठ्ठीत भाजपचे नाव आल्यानंतर संजय कामतेकर यांची निवड करण्यात आली.

अशा प्रकारे शांततेत पाच सदस्यांची स्थायी समिती गठीत करण्यात आली.

या वेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, तसेच नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page