सहकार मंत्री पाटील यानी व्यक्त केला विश्वास
*💫मालवण दि.२२-:* तौक्ते वादळाचा सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात मोठा तडाखा बसला आहे. अशा संकटात राज्य शासन आपतग्रस्तांच्या पाठीशी आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर सरकार कडून मदत जाहीर होईल. जनतेने विश्वास ठेवावा, महाविकास आघाडीचे सरकार आपतग्रस्तांना मदत देऊन नक्की दिलासा देईल असा विश्वास राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. तौक्ते वादळामुळे मालवण तालुक्यात झालेल्या नुकसानीबाबत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मालवणला भेट देत मालवण शहर व वायरी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर कुंभारमाठ येथे जानकी मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, प्रवीण भोसले, संदेश पारकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकरशिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, नगरसेविका तृप्ती मयेकर, तपस्वी मयेकर, तुळशीदास मयेकर, सदानंद मालंडकर, आगोस्तिन डीसोजा, सौ. सुमेधा खटखटे, प्रमोद कांडरकर, बाबू डायस तसेच तहसीलदार अजय पाटणे,पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर व इतर उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, तौक्ते वादळाने मालवण, वेंगुर्ला, देवगड तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली असून घरांचे नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नौकांचे तसेच वीज विभागाचेही मोठे नुकसान झाले. पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय नुकसान किती झाले हे कळणार नाही. पंचनामे पूर्ण झाल्यावर सरकारकडून मदत जाहीर करण्यात येईल. याबाबत वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असेही मंत्री पाटील म्हणाले. एखाद्या घराची मालक व्यक्ती मयत असल्यास त्याच्या वारसांना मदत मिळेल. सुलभ रीतीने मदत देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. फळ झाडांच्या उत्पन्न क्षमतेची माहिती घेऊन त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. मच्छीमारांच्या नौका, मासेमारी साहित्य यांचेही मोठे नुकसान झाले. मच्छीमारी सहकारी संस्था, रापण मासेमारी आदी सहकारी पद्धतीवर चालत असल्याने सहकाराच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी सहकार विभागाला सूचना करण्यात येतील, असेही मंत्री ना. पाटील म्हणाले. वादळात मोठ्या प्रमाणात वीज पोल व वीज वाहिन्या तुटून पडल्याने वीज वितरण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बाहेरून मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. वीज पोलांचा पुरवठा होत असला तरी इतर वीज साहित्याची कमतरता भासत आहे. जिल्ह्यात या साहित्याची इंडस्ट्री नसल्याने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी आपण याबाबत चर्चा केली आहे. कोल्हापूर मधून आवश्यक वीज साहित्य पाठविण्याची सूचना आपण तेथील जिल्हाधिकाऱ्यांना केली असून जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून कोल्हापूर वरून वीज वितरण विभागाकडून वीज साहित्य पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच वीज वितरण विभागाच्या बारामती झोनच्या चीफ इंजिनियरचे आपण लक्ष वेधले असून बारामती झोनचे २०० वीज कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहेत, असेही मंत्री पाटील म्हणाले.
