⚡वेंगुर्ला ता.०१-: सिंधुदुर्ग आंबा व काजू बागायतदारांची मंत्री व आमदारांशी महत्वपूर्ण बैठक आज रविवारी १ मार्च रोजी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत चिपळूण येथे पार पडली. सदर बैठकीस शेतकरी नेते राजू शेट्टी हेही उपस्थित होते. या बैठकीत यावर्षी आंबा बागायतदारांवर आलेल्या अभूतपूर्व नैसर्गिक व आर्थिक संकटाची सविस्तर माहिती मंत्री व आमदारांना देण्यात आली. उत्पादनातील मोठी घट, कर्जबोजा, वाढते उत्पादन खर्च तसेच तातडीच्या नुकसानभरपाईची गरज याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार व व्यापारी संघाच्या वतीने कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, शासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास दिनांक १२ मार्च रोजी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, याची माहितीही संबंधित मंत्री व आमदारांना देण्यात आली. शेतकऱ्यांना भरघोस नुकसानभरपाई पॅकेज, कर्जमाफी व तातडीची मदत जाहीर व्हावी, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
सदर बैठकीस वेंगुर्ला येथून उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे, माजी नगरसेवक पिंटू गावडे, चेतन कुबल, मंदार परब , ललितकुमार ठाकूर, नितेश मयेकर, वैभव फटजी, सिद्धार्थ नरसुले, अभिषेक चमणकर, सुजित चमणकर आदी उपस्थित होते.
तसेच देवगड येथून शरद परब, अजय तेली, प्रशांत शिंदे, तुषार पाळेकर, गणेश गावकर, किरण टेम्बुलकर, गणेश वाळके, , नीरज घाडी, तेज मामघाडी, सचिन लोके, तिमिर माणगावकर आदी उपस्थित होते. कोकणातील सर्व आमदारांना निवेदन देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी विधानभवनात लक्षवेधी मांडावी व आवाज उठवावा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे,पालघर येथील आंबा बागायतदाराना नुकसान भरपाई मिळवी अशी मागणी करावी. त्यासाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्याल्यावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेच्या वतीने आंबा काजू नुकसानी संदर्भात शासनाकडून भरीव नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी शेतकरी बागायतदार शिष्टमंडळाने आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी याबाबत अधिवेशनात आपण लक्षवेधी मांडणार असून शासनाकडून शेतकरी बागायतदार यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच मंत्री भरत गोगावले यांनी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.
कोकणातील आंबा बागायतदारांना भरघोस नुकसानभरपाईसाठीअधिवेशनात लक्षवेधी मांडणार-: आ. निलेश राणे…
