⚡मालवण ता.०१-:
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी येथील नाझिया सनाऊल्ला खान या वीस वर्षीय युवतीने राहत्या घराच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल शनिवारी रात्री घडली. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नाजिया खान हिचा भाऊ आफरीन चौधरी याने मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. या खबरीनुसार मागील दोन महिन्यापासून नाझिया ही आपल्या वडिलांना बाहेर कुठेतरी कामाला जाते असे सांगायची. परंतु ती घरात सर्वात लहान असल्याने वडिलांनी तिला बाहेर कामास जाऊ नको असे सांगितले होते. तेव्हापासून ती गप्प गप्प असायची व घरातील माणसांशी जास्त बोलायची नाही. काल शनिवारी रात्री तिचा भाऊ व आई घरात नमाज पठण करत असताना नाझिया नमाज पठण करत नव्हती, ती बाहेर खुर्चीवर बसलेली होती. तर वडील व दुसरा भाऊ हे रमजान महिना असल्याने नमाज पठण करण्यासाठी वायरी येथील मस्जिद मध्ये गेलेले होते. रात्रौ साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नाझिया ही घरात व बाहेर अंगणात कुठे दिसून न आल्याने भाऊ व घरातील इतरांनी घराच्या आजूबाजूला तिची शोधाशोध केली असता असता राहत्या घराच्या जिन्याच्या बाजूला लागूनच असणाऱ्या आंब्याच्या झाडाला नाझिया हिने ओढणीने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळून आली. याचवेळी तिचे वडील व भाऊ हे नमाज पठण करून घरी आले होते. यावेळी नाझिया ही गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली घरातील मंडळींनी तिला खासगी रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आणले, मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक प्रतिज्ञा खोत या अधिक तपास करत आहेत.
