विधिमंडळात आम. निलेश राणे उपस्थित केले कोकणातील ज्वलंत प्रश्न:कोकणवासियांनी रस्त्यावर उतरण्याची गरज;कुणाल किनळेकर..
⚡कुडाळ ता.०१-: महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात कोकणातील ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी आभार मानले आहेत. निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, जवळपास वीस वर्षांपासून कोकणाच्या प्रगतीसाठी अडथळा ठरलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी विधान भवनात जे परखड भाष्य केले त्यासाठी कोकणवासीय तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने त्यांचे धन्यवाद. आमदार निलेश राणे यांनी विधान भवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसरा महत्त्वाचा विषय मांडला तो म्हणजे वन विभागाच्या गलथान कारभाराचा. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरकार मार्फत रोजगारासाठी कोणत्याही उपाययोजना होत नसताना हतबल आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे नागरिक कात उद्योजक नारायण जाधव यांचा शासन नियमानुसार सुरू असलेला कात व्यवसाय बंद करण्यासाठी वनविभागाचे परराज्यातील अधिकारी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. म्हणूनच आमदार निलेश राणे यांना जिल्ह्याचा नागरिक म्हणून विनंती आहे की केवळ वनमंत्र्यांना टार्गेट म्हणून नाहीतर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना व व्यावसायिकांना या परराज्यातील परजिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत होणारा त्रास यासाठी प्रत्यक्षात वस्तुस्थितीची माहिती घेऊन त्या विभागावर धडक द्यावी. प्रशासनाला जाग आणण्याकरिता आंदोलनात्मक भूमिकेसाठी सिंधुदुर्गातील नागरिकांसाठी आम्ही आपल्या सोबत येण्यास तयार आहोत असे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी म्हटले आहे.
