कोलगावात पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय पाईपलाईनचे काम होऊ देणार नाही…

मायकल डिसोजा:ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला एकमुखी ठराव..

⚡सावंतवाडी ता.०१-: कोलगाव गावाच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असताना गावाच्या हद्दीत कोणत्याही नव्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम होऊ दिले जाणार नाही, असा ठाम इशारा जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला आहे. कोलगाव येथे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत याबाबत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.
कोलगाव हद्दीत असलेल्या पाळणेकोंड धरण साठी कोलगाव गावातील जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबे व एक संपूर्ण वाडी विस्थापित झाली आहे. तसेच शेकडो एकर जमीन कोलगाव व कुणकेरी गावातील गेली आहे. धरणाचे शुद्धीकरण केंद्र कुणकेरी गावात असूनही या दोन्ही गावांतील नागरिकांना पाण्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून कोलगाव व कुणकेरी गावकऱ्यांनी सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सहकार्य केले. मात्र स्थानिकांना पाणी देण्याबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. आमदार दीपक केसरकर यांनी ग्रामपंचायतीशी केलेल्या करारानुसार पाणी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात कोलगाव व कुणकेरी गावकरी आजही पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सध्या नव्याने टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनसाठी कोलगावची जमीन वापरण्यात येत असल्याने, जोपर्यंत गावाची पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत कोणतेही काम हद्दीत करू देणार नाही, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. आवश्यक असल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून पुढील दिशा व आंदोलनाची रूपरेषा मायकल डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

You cannot copy content of this page