सर्वोदय नगरात कुत्र्यावर झडप:भीतीचे वातावरण..
⚡सावंतवाडी ता.०१-: सालईवाडा परिसरात नुकतेच गवे रेडे आले असताना येथीलच सर्वोदय नगर येथे काल मध्यरात्री बिबट्या आल्याचे समोर आलेय. या बिबट्याने एका घराच्या कुंपणात शिरकाव करत कुत्र्यावर झडप घातली. त्याला हा श्वान फस्त करून जंगलाच्या दिशेने पळ काढला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री उशिरा सर्वोदय नगरमधील एका घरासमोरील कुंपण ओलांडून बिबट्या आत शिरला. काही क्षण दबा धरून बसल्यानंतर त्याने कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याला जबड्यात पकडून तो जंगलाच्या दिशेने पसार झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर कॉलनीतील नागरिकांनी वनविभाग आणि नगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळेच बिबट्या मानवी वस्तीकडे आकर्षित होत असल्याचे मतही स्थानिकांनी मांडले. परिसरात तातडीने पिंजरा लावावा, रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी व रस्त्यांवरील पथदिवे तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी केली. सर्वोदय नगरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
