⚡सावंतवाडी ता.२८-:
सात-बारा उताऱ्यावरील आडनाव दुरुस्त करून देण्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील तलाठी प्रवीण दिलीप पोले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाईच्या कक्षेत आणले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या बहिणीने तिच्या मालकीच्या सात-बारा उताऱ्यावरील चुकीचे आडनाव दुरुस्त करण्यासाठी २०२५ मध्ये सावंतवाडी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी निरवडे येथील सजा कार्यालयात पाठवण्यात आला होता. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार २९ डिसेंबर २०२५ रोजी तलाठी प्रवीण पोले यांना भेटले असता, पोले यांनी हे काम करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३० डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी एसीबीच्या पथकाने निरवडे येथील कार्यालयात पडताळणी केली. यावेळी आरोपी प्रवीण पोले याने २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने पथकाने तत्काळ कारवाई केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दीपक माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.
सात-बारा उताऱ्यावर आडनाव दुरुस्तीसाठी लाच मागणारा निरवडेचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात…
