प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांचे आयोजन..
⚡मालवण ता.२८-:
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामानाने देशभरात नशा मुक्ती भारत अभियान राबविण्यात येत असून मालवण शहरात या अभियानाचा शुभारंभ मालवण नगरपालिका येथे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी चलचित्राच्या माध्यमातून तसेच पत्रके वाटून नशा मुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची जनजागृतीपर चलचित्र दाखविणारी व्हॅन आज मालवण शहरात दाखल होऊन शाळा व शासकीय कार्यालये याठिकाणी भेटी देऊन नशा मुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मालवण नगरपालिका येथे या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी तसेच ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या डॉ. भारती बेहेन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भारती बेहेन, वर्षा दीदी, निलिमा दीदी, राखी दीदी, मेघा दीदी, नूतन दीदी तसेच अशोक, नारायण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. भारती बेहेन यांनी नशामुक्त भारत अभियान या उपक्रमाची माहिती देत आज भारतात युवा व तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी गेली असून यामुळे रोज अनेक जणांचा मृत्यू होत आहे, तसेच अनेक कुटुंबेही उध्वस्त होत आहेत, त्यामुळे सर्वांनी व्यसनांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आज स्पर्धेच्या युगात तरुणांनी आपले कर्तृत्व दाखवून पुढे जाणे आवश्यक असताना अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसन व नशेच्या आहारी जाऊन आयुष्य खराब करून घेत आहेत, त्यामुळे आज असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे, तरुणांनी व्यसनमुक्त होण्याबरोबरच तणावमुक्त झाले पाहिजे, या उपक्रमास नगरपालिकेचे आवश्यक ते सहकार्य लाभेल, असे सांगितले. यावेळी नगरपालिकेतर्फे अधिकारी हेमराज चव्हाण यांनीही विचार मांडत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
