⚡वेंगुर्ला ता.२८-: जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाची निवड 16 मार्च रोजी होणार आहे. याबाबत शासनामार्फत शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली असून वेंगुर्ला तालुक्याला अध्यक्ष पदासाठी पुन्हा प्रतिनिधित्व मिळणार का, याकडे संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातून महायुतीतर्फे रेडी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले भाजपचे प्रितेश शंकर राऊळ यांच्या नावाची चर्चा असून खा. नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे त्यांना संधी देणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मागील टर्मला खा. नारायण राणे यांनी भाजपच्या आडेली जि. प. सदस्य समिधा समिर नाईक यांनी 1 वर्ष 2 महिने कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदी संधी देत वेंगुर्ला तालुक्याला प्रतिनिधित्व दिले होते. तर रेडी – प्रितेश राऊळ व उभादांडा – दादा कुबल यांना शिक्षण व आरोग्य सभापती पदाची संधी दिली होती. यातील प्रितेश राऊळ हे सलग दुसऱ्यांदा रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून अन्य 4 उमेदवारांना पराभूत करीत निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना नव्याने अध्यक्ष पदासाठी संधी मिळणार का, याबाबत तालुकावासीय, भाजपा पदाधिकारी यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यांना खा. नारायण राणे यांनी संधी दिल्यास वेंगुर्ला तालुक्याला सलग दुसरी टर्म जि. प. अध्यक्ष पदाची संधी मिळू शकते.प्रितेश राऊळ यांनी मागील टर्मला जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून 2 वर्षे काम करताना विकासात्मक कार्य केले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी “बांधावरची शाळा ” ही महत्वाकांक्षी योजना अमलात आणल्याने यामुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात हा उपक्रम आदर्शवत ठरला व कृषी विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांना – शिक्षकांना शेतकऱ्याची श्रमप्रतिष्ठा, कष्ट व शेतीविषयी आवड आदी बाबींचे महत्व अधोरेखित झाले. तसेच त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्कॉलरशिप परीक्षा, एजयुकेशन एक्सपो, विद्यार्थ्यांना इस्रो सफर आदी महत्वाकांक्षी उपक्रम राबविले आहेत.त्यापूर्वी त्यांनी रेडी उपसरपंच म्हणून काम करताना रेडी ग्रामपंचायतला हागंदारीमुक्त गाव, तंटामुक्ती गाव पुरस्कार मिळवून देत रेडी गावच्या विकासासाठी चांगले कार्य केले आहे.vत्यामुळे प्राधान्याने त्यांच्या नावाला पसंती मिळणार का, असा सूर व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेडी गावाचे नाव चर्चेत आले आहे.
सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्ष पदासाठी वेंगुर्ला – रेडीचे प्रितेश राऊळ रेसमध्ये…
