सावंतवाडीत ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात : डिजिटल युगात मराठी संवर्धनाची शपथ…

यशवंतराव भोसले बी फार्म काॉलेजच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन..

⚡सावंतवाडी,ता.२८-:
मराठी भाषेच्या गौरव आणि संवर्धनाच्या उद्देशाने यशवंतराव भोसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथे आज ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या आचार्य चरक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना होती — “मराठी भाषेचे संवर्धन – काळाची गरज”. आधुनिक आणि डिजिटल युगात मराठीचे स्थान अधिक भक्कम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. निवृत्ती कर्वेकर आणि प्रा. डॉ. रमाकांत गावडे (गोगटे–वाळके महाविद्यालय, बांदा) उपस्थित होते. तसेच ‘कोकण लाईव्ह’चे संपादक श्री. सीताराम गावडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अ. जगताप हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दोन्ही वक्त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणातून मराठी भाषेचा वैभवशाली इतिहास, संत-साहित्याची परंपरा, सामाजिक चळवळींतील मराठीचे योगदान आणि बदलत्या काळात भाषेचे जतन करण्याची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले. “भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृतीची ओळख आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विशेषतः दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर, शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात मराठीतील लेखन-वाचन वाढविणे, तसेच पुढील पिढीपर्यंत मराठीचा समृद्ध वारसा पोहोचविण्याची जबाबदारी यावर भर देण्यात आला. डिजिटल माध्यमांमध्ये मराठीची उपस्थिती वाढविणे ही काळाची गरज असल्याचेही वक्त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, आत्मभान आणि जाणीव निर्माण झाली. महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समितीच्या स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमास लाभला.एकूणच, हा कार्यक्रम मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देणारा आणि समाजप्रबोधन घडवणारा ठरला.या कार्यक्रमासाठी
सादर जतिन अ. टेकावडे
समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समिती,विनोद रा. बिरादार
समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समिती,प्रा. डॉ. विजय अ. जगताप,प्राचार्य, यशवंतराव भोसले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, सावंतवाडी यांचे योगदान महत्त्वाचे होते.

You cannot copy content of this page