नगरपालिकेला निवेदन:स्वच्छता, खुर्च्या, एसी दुरुस्ती व देखभालीसाठी कायम कर्मचारी नियुक्तीची केली मागणी..
⚡मालवण ता.२७-:
मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहातील असुविधांबाबत आमने सामने नाटकाच्या कलाकारांनी व्यक्त केलेली नाराजी मान्य असली तरी याबाबत सोशल मीडियावर रिल्स बनवून नाट्यगृहाची व मालवणची केलेली बदनामी मालवणातील आम्हा रंगकर्मींसाठी संतापजनक आहे. मालवणचे मामा वरेरकर नाट्यगृह हे मालवणसह जिल्ह्यातील कलाकारांसाठी एक मोठे सांस्कृतिक केंद्र असून नाट्यगृहातील कमतरतांबाबत स्थानिक कलाकारांनी यापूर्वी नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. त्यामुळे मालवण नगरपालिकेने नाट्यगृहाबाबत गांभीर्याने लक्ष घालून तेथील कमतरता, असुविधा व समस्या लवकरात लवकर दूर करून नाट्यगृह सुसज्ज बनवावे, अशी मागणी मालवणातील कलाकार व नाट्यप्रेमींनी मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मालवण मधील कलाकार व नाट्य प्रेमीनी मालवण नगरपालिकेत नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांची भेट घेऊन मामा वरेरकर नाट्यगृहाच्या समस्यांबाबत चर्चा करत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संजय शिंदे, सुनील परुळेकर, गौरव ओरसकर, सुजाता शेलटकर, महेश काळसेकर, प्रफुल्ल देसाई, शुभदा टिकम, रत्नाकर सामंत, सुधीर गोसावी, समृद्धी आसोलकर, पूजा सरकारे, श्रीराज बादेकर, भूषण मेतर, राहुल जाधव, मेगल डिसोजा आदी उपस्थित होते.
मामा बरेरकर नाटयगृहामध्ये झालेल्या ‘आमने सामने’ या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगानंतर त्यातील प्रमुख कलाकारांनी रसिक प्रेक्षकांसमोर नाट्यगृहाच्या विविध समस्यांबावत जाहिर नाराजी व्यक्त केली होती व त्यांनी सोशल मिडीयावर विविध रिल्स टाकुन नाटयगृहाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत नगर वाचन मंदिर, मालवण येथे मालवणातील रंगकर्मींची एक बैठक होऊन त्यामध्ये या बदनामीविरोधात मालवणातील रंगकर्मींनी संताप व नाराजी व्यक्त केली, असे यावेळी उपस्थित कलाकारांनी सांगितले. नाट्यगृहाच्या समस्यांबाबत स्थानिक कलाकारांनी यापूर्वीही नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. नाटयपरिषद मालवण शाखेच्यावतीने कलाकारांच्या एका शिष्टमंडळामार्फत प्रशासनाला निवेदन दिल्यावर पावसाळ्यात गळणारे नाटयगृहाचे छप्पर व रंगमंचाच्या नुतनीकरणाचे काम नगरपालिकेने हाती घेतले होते, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असेही यावेळी कलाकारांनी सांगितले.
नाटयगृहातील स्वच्छतागृह, प्रेक्षागृहातील मोडक्या खुर्च्या, लाईट व्यवस्था, बंद एसी, नाट्यगृह इमारत परिसरातील असलेले भंगार साहित्य इत्यादी बाबत नाराजी व्यक्त होत आहे. प्रेक्षागृहातील आसने ही केवळ दुरूस्ती न करता नव्याने बसवण्यात यावीत. नाट्यगृहाच्या व्यवस्थापन / देखरेखीसाठी कायम स्वरूनी कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, मामा वरेरकर नाटयगृह हे मालवण शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असल्यामुळे त्याकडे फक्त उत्पन्नाचे साधन म्हणून पाहण्यात येऊ नये, नाटयगृहाच्या नुतनीकरण / दुरूस्तीचे काम सुरू असताना नाटयगृह कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवण्यात येऊ नये, नाट्यगृहाच्या देखभालीसाठी नगर परिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकात प्रतिवर्षी पुरेशी आर्थिक तरतुद करण्यात यावी, नाट्यगृहाच्या नुतनीकरण / दुरुस्ती कामावर देखरेख करून नगरपरिषदेला वेळोवेळी सूचना करण्यासाठी स्थानिक अनुभवी रंगकर्मीच्या समितीची निवड करण्यात यावी, मालवणमधील स्थानिक कलावंतांना त्यांच्या मागणीनुसार कार्यक्रम / तालमींकरिता अल्प भाडयात नाट्यगृह उपलब्ध करून देण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.
मामा वरेरकर नाट्यगृह हे कोकणातील एक उत्तम व शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेले नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह मालवणची ओळख असून कलाकारांसाठी ते मंदिर आहे, त्यामुळे नाट्यगृहातील त्रूटी तात्काळ दूर करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेने पावले उचलावीत आणि नाट्यगृह सुसज्ज करावे, यासाठी कलाकारांचे जे काही सहकार्य आवश्यक असेल ते आम्ही निश्चितपणे करू, असे यावेळी कलाकारांनी सांगितले. यावर नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी आम्ही नगरपालिकेची पाहणी करून सर्व समस्या जाणून घेतल्या असून नाट्यगृहाच्या स्वच्छतेचे तसेच खुर्च्या दुरुस्ती, एसी दुरुस्ती आदी कामे प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे असे सांगत इतर समस्याही मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.
