स्वच्छ व हरित ग्रामपंचायत चा उपक्रम..
कुडाळ : घराभोवतीच्या मोकळ्या जागेत अनेक प्रकारच्या भाज्या व फळ पिके तेही सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करून झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांनी परसबाग फुलवली आहे. या परसबागेत विविध प्रकारची उपयोगी झाडे,पाच ते सहा प्रकारचे फुलझाडेही आहेत. त्याची प्रेरणा घेत गावातील अनेकांनी तशा परसबागा फुलविण्याची धडपड सुरू केली आहे. दैनंदिन लागणाऱ्या भाज्या घरासाठी उपलब्ध होत आहेत. मात्र त्यातून काही विक्री करून आर्थिक पाठबळही मिळू लागले आहे. हा प्रयोग परिसरात प्रेरणादायी ठरणारा आहे.
सरपंच दक्षता मेस्त्री यांनी आपल्या घराभोवतीच्या जागेचा अत्यंत बहुमोल उपयोग केला आहे. त्या जागेवर मिरची , वांगी , टेमॅटो मुळा , कारले , फ्लॉवर ,, भेंडी , वाल ,यांची लागवड करून आदर्श परसबाग फुलविली आहे.
दक्षता मेस्त्री यांनी परसबागेत भाज्यांना कोणत्याही रासायनिक खतांच्या डोस व फवारणी न करता सेंद्रिय पद्धतीने आंतरपीक पद्धतीने पेरणी करण्याचा प्रयोग केला आहे. सध्या बाजारपेठेत रासायनिक खतांची मात्रा भरमसाठ दिलेला भाजीपाला विक्रीसाठी येतो. मात्र या परसबागेत सेंद्रिय शेतीसारखे प्रयोग करून भाजीपाला लागवड केली आहे. परसबागेच्या हा प्रयोग पाहण्यासाठी अनेकजण येथे भेट देण्यासाठी येत आहेत.
फळे,फुल झाडांची लागवड केवळ भाजीपाला न लावता परसबागेत सुरगी सारखी फुलझाडे ही लावली आहेत. या परसबागेत मेस्त्री कुटुंबातील सर्व सदस्य आवडीने काम करतात. कुटुंबाला लागणारा भाजीपाला घरीच उपलब्ध होत आहे. कमी जागेत जास्त भाज्या लावण्याचा प्रयोग केला असल्याने जास्त भाज्या व पिके घेऊ शकत असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले.
केवळ कुटुंबाला लागणारा भाजीपालाच येथे मिळत नाही तर तयार होणारा भाजीपाला गावात देखील ते विक्री करणार असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले. त्यामुळे या परसबागेतून रोजगार निर्मिती देखील होत आहे.
अनेकांसाठी प्रेरणादायी या परसबागेला पाहून झाराप गावातील अनेक जणांनी आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या जागेत परसबाग फुलविण्यास सुरुवात केली आहे. त्यामूळे परसबाग फुलविण्याची जणू आता स्पर्धा गावात लागली आहे.
तीस चाळीस वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावांत अशा परसबागा घरोघरी असत. त्या परसबाग संस्कृतीची आठवण यामुळे अनेकांना आली आहे. ह्या परसबागा आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आवश्यक असल्याने त्यांची वाढच होण्याची गरज आहे.
