⚡मालवण ता.२७-:
मालवण येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा झांट्ये यांनी लिहिलेल्या १०० इंग्रजी कवितांचा संग्रह असणारा ” १०० शिल्पा कविता’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दि १ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता झाटये हॉस्पिटल रेवतळे मालवण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
डॉ. झांट्ये या जिल्ह्यातील आघाडीच्या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय व्यवसायात रुग्णांच्या आयुष्यातील चढ-उतार, प्रसूतीतील धाडस, मातृत्वाचा आनंद आणि स्त्रियांचा संघर्ष त्यांनी अत्यंत जवळून अनुभवला आहे. याच अनुभवांना त्यांनी काव्यबद्ध केले आहे. या संग्रहातील कवितांमधून सकारात्मकता, जिद्द आणि जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टिकोन दिसून येतो.
डॉ. झांट्ये यांच्या कविता केवळ अनुभवापुरत्या मर्यादित नसून त्या समाजाला दिशा देणाऱ्या आहेत. ‘गिफ्ट्स फॉर फ्री’ या कवितेतून त्यांनी निसर्गाकडून मोफत मिळणाऱ्या अमूल्य देणग्यांची जाणीव करून दिली आहे. धावपळीच्या युगात आपण साध्या सुखांकडे दुर्लक्ष करतो, असा संदेश त्यांनी दिला आहे. ‘इज ओल्ड रिअली गोल्ड’ या कवितेतून आधुनिकतेच्या मागे धावताना आपण जुना वारसा आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे अनुभव विसरत चाललो आहोत का, असा रोखठोक प्रश्न त्यांनी मांडला आहे.
आपल्या या साहित्यिक प्रवासाचा लाभ भावी पिढीला व्हावा, या हेतूने या कवितासंग्रहाच्या काही प्रति शाळा आणि वाचनालयांना विनामूल्य भेट देण्यात येणार असल्याचे डॉ. झांट्ये यांनी जाहीर केले आहे.
वैद्यकीय पेशा सांभाळून जोपासलेली ही साहित्यिक आवड आणि त्यातून साकारलेला हा काव्यसंग्रह वाचकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
