सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:कणकवलीत मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡कणकवली ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य यंत्रणेवर विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली येथे मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५०० हून अधिक रुग्णांनी सहभाग घेत विविध आजारांची तपासणी करून घेतली.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘मल्टी’ स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे हा कॅम्प पार पडला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कॅम्पला भेट देऊन उद्घाटन केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अनंत दवंगे, कणकवली रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. नीलिमा इनामदार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, डॉ. विशाल रेड्डी, डॉ. पंकज पाटील, डॉ. माधव उबाळे, डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेट्ये, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, इंचार्ज सिस्टर एस. तिवरेकर यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून नियमित सेवा दिली जात असली तरी अधिक दर्जेदार आणि विशेष तज्ज्ञांची सेवा देण्यासाठी या मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेरील स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलविण्यात आले असून रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कॅम्पच्या माध्यमातून रुग्णांचे दर तीन महिन्यांनी फॉलोअप घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यातील हा पहिलाच मोठा स्पेशालिटी कॅम्प असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.

You cannot copy content of this page