पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील माळरानावर अवैध धंदे सुरू असून त्याला यंत्रणेतील काही जणांचा आशीर्वाद..
कणकवली : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने त्या आदेशांना केराची टोपली दाखवली, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा करत होते. अशांवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवैध धंदे बंद न झाल्याने आंदोलन करण्याचे निवेदन दिले आहे. त्यामुळे घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष कृतीत तफावत दिसून येत आहे, असेही श्री. उपरकर म्हणाले,
पुढे ते म्हणाले की, केसरकरांसारखा यंत्रणेवर विद्यमान पालकमंत्र्यांचा धाक राहिलेला नाही. त्यांच्या मतदारसंघात माळरानावर अवैध धंदे सुरू असून त्याला यंत्रणेतील काही जणांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. दिवसाला की महिन्याला याची खात्री नसली तरी पन्नास हजार रुपयांची मागणी झाल्याचे समोर आले आहे. पोलीस गुरांच्या गाड्या, दारूच्या गाड्या पकडून काही प्रकरणे मोठ्या रकमेत बाहेरच मिटवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पालकमंत्री तोंडाने एक बोलतात, पण प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसते, असा आरोपही माजी आम. परशुराम उपरकर यांनी केला.
दरम्यान, पालकमंत्र्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात मोठा गौफ्यस्फोट केल्याचे उपरकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू कारखाना सुरू असून अमली पदार्थांची विक्री लहान मुलांकडून केली जात असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले. मात्र पोलीस मुळापर्यंत पोहोचत नाहीत, असेही ते म्हणाले. अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी नमूद केले. या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केल्याबद्दल निलेश राणे यांचे उपरकर यांनी अभिनंदन केले.
शेवटी त्यांनी सांगितले की, किमान आता तरी पालकमंत्री नितेश राणे यांनी बोध घ्यावा. ज्या सभागृहात ते आहेत, त्याच सभागृहात त्यांच्या आमदार बंधूंनी अवैध धंद्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या घोषणा या केवळ दिखाव्यासाठी की हप्ते मिळवण्यासाठी, याचे उत्तर जनतेसमोर यायला हवे असेही ते म्हणाले.
