देवगडमध्ये एकाच तलाठ्यावर १० गावांचा भार…

विलास साळसकर आक्रमक,उपोषणाचा इशारा..

⚡​देवगड ता.२६-:
देवगड तालुक्यातील महसूली प्रशासनाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसत असून, मोंड सज्जाच्या तलाठ्यांकडे तब्बल १० गावांचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन येत्या ४ दिवसांत मार्ग न निघाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

मोंड येथील मूळ सज्जावर मे २०२५ पासून तलाठी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोंड, मोंडपार, मळेगाव आणि चिंचवाड ही मूळ गावे असतानाच, मागील वर्षभरापासून बापर्डे व जुवेश्वरचा पदभार देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २०२१ पासून गढीताम्हाणे आणि रहाटेश्वर या सज्जांचा भारही त्यांच्याकडेच आहे. त्यातच आता मागील ३ महिन्यांपासून वानिवडे आणि पावणाई या गावांचीही जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.

१० गावातील नागरिकांना कामासाठी मोंड येथे चकरा माराव्या लागतात, ज्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे.

तलाठ्यांकडे लॅपटॉप आणि प्रिंटर यांसारख्या मूलभूत साधनांची कमतरता आहे.
​नेटवर्कची अडचण: गढीताम्हाणे, रहाटेश्वर, वानिवडे आणि पावणाई या भागात नेटवर्क नसल्याने ऑनलाईन कामे ठप्प आहेत. राउटर वापरूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावोगावी फिरताना नागरिकांनी या समस्यांचा पाढा साळसकर यांच्यासमोर वाचला. “प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी आणि सामान्य जनता भरडली जात आहे,” असे विलास साळसकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

या समस्यांवर येत्या ८ दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढून प्रशासनाने लेखी अहवाल सादर करावा. जर येत्या ४ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर १० गावातील ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर तीव्र उपोषण छेडले जाईल, असा इशारा तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी दिला आहे. यामुळे आता महसूल विभाग काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे

You cannot copy content of this page