ग्रामस्वच्छता अभियानात बापर्डे विभागात प्रथम…

बापर्डे गावाचा कोकण विभागीय आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव..

⚡देवगड ता.२५-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१९-२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बापर्डे ग्रामपंचायतीने विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात मा. कोकण विभागीय आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन बापर्डे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

 यावेळी हा पुरस्कार स्वीकारताना गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , बापर्डेचे सरपंच संजय लाड, उपसरपंच गुणवंत राणे, तात्कालीन ग्रामपंचायत अधिकारी शिवराज राठोड, ग्रामपंचायत अधिकारी विजू देवीसिंग घुनावत, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सुविधा पुजारे व रविना मुळक, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रियांका राणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदीप नाईकधुरे, विशेष कार्यकारी अधिकारी जीवन नाईकधुरे, समूहसमन्वयक विनायक धुरी, ग्रामपंचायत कर्मचारी विजय मेस्ती, प्रशांत देवळेकर, सरोज नाईकधुरे तसेच प्रविण राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

बापर्डे ग्रामपंचायतीने यापूर्वीही विविध उपक्रमांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. निर्मल ग्राम पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार तसेच ISO मानांकन प्राप्त करून गावाने स्वच्छतेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि जनजागृती यांसारख्या उपक्रमांमुळे गावाने आदर्श निर्माण केला आहे.

गावातील या यशस्वी उपक्रमांची पाहणी करण्यासाठी राज्यातील विविध जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी वेळोवेळी भेट देत आहेत.

या यशामागे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती देवगड यांचे मार्गदर्शन, ग्रामपंचायत बापर्डेची संपूर्ण टीम तसेच सर्व ग्रामस्थांचे सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सरपंच संजय लाड यांनी केले. गावामध्ये भजनाच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती करणारे भजनी बुवा संदीप नाईकधुरे यांचाही या मोहिमेत मोलाचा सहभाग आहे.

बापर्डे गावाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून गावावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page