कालव्यालगतच्या धोकादायक रस्त्याला संरक्षक गार्ड…

साईप्रसाद काणेकर यांच्या पाठपुराव्याला यश..

⚡बांदा ता.२५-:
बांदा–डिंगणे (बांबर्डी) मार्गावरील कालव्यालगतचा धोकादायक रस्ता अखेर सुरक्षित झाला असून त्या ठिकाणी संरक्षक गार्ड (रेलिंग) बसविण्यात आले आहेत. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

बांदा डिंगणे मार्गावर कालव्याच्या कडेला असलेला रस्ता अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठरला होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला कोणतीही संरक्षक भिंत किंवा गार्ड नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत होता. काही वेळा दुचाकी घसरून किरकोळ अपघातही घडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर साईप्रसाद काणेकर यांनी संबंधित विभागाकडे वारंवार निवेदने देत संरक्षक गार्ड बसविण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर प्रशासनाने दखल घेत त्या कालवा मार्गावर मजबूत लोखंडी संरक्षक गार्ड बसविण्याचे काम पूर्ण केले आहे.

सदर काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. “आता हा मार्ग प्रवासासाठी अधिक सुरक्षित झाला असून अपघाताची शक्यता कमी झाली आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार व रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी हा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे.

साईप्रसाद काणेकर यांनी “दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रत्यय” देत हा प्रश्न मार्गी लावला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांनी संबंधित विभागाचेही आभार मानले आहेत.

दरम्यान, भविष्यात अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था उभारावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page