संत गाडगेबाबा जयंती निमित्त दोडामार्गमध्ये ई-वेस्ट संकलन उपक्रमाची सुरुवात…

⚡दोडामार्ग ता.२३-:
संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधत पूर्णम इकोव्हिजन संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यावरण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथे इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-वेस्ट) संकलन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला दोडामार्ग नगरपंचायत यांचे सहकार्य लाभले.
उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पर्यावरण गतिविधीचे संयोजक शरदचंद्र गवस तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीच्या विचारांचा उल्लेख करत आधुनिक काळातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक, टीव्ही, प्रिंटर, बॅटऱ्या, चार्जर यांसारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरात येतात. या वस्तूंचा वापर संपल्यानंतर त्या घरात साठवून ठेवणे किंवा सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे पर्यावरणासाठी घातक ठरते. ई-वेस्टमधील धातू, रसायने आणि प्लास्टिकमुळे माती, पाणी व हवा प्रदूषित होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा वस्तू अधिकृत संकलन केंद्रात जमा करून वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ठराविक दिवशी शहरात ई-वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांना घरातील जुनी व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शाळा-महाविद्यालयांमध्येही जनजागृती कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सवयी लावण्यावर भर देण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा यांनी दिलेला “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संदेश केवळ रस्ते व परिसरापुरता मर्यादित न ठेवता आधुनिक कचरा व्यवस्थापनातही अंगीकारणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे दोडामार्ग शहरात स्वच्छता चळवळीला नवे बळ मिळणारार असून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page