चिमणी पाखरं’ चा २८ ला कुडाळमध्ये ‘जलवा’…

३०१ व्या प्रयोगाचे मोफत आयोजन..

⚡कुडाळ ता.२२-: चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित ‘जलवा’ या डान्स शो चा ३०१ वा प्रयोग शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मराठा समाज हॉल कुडाळ या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चिमणी पाखरं डान्स अकॅडमीने तारका, अप्सरा यांसारखे अनेक व्यावसायिक डान्स शो केले. या डान्स शो मुळे जिल्हाभरातील अनेक कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळालं. या सगळ्या डान्स शोला जिल्हावासियांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. परंतु जिल्हावासियांच्या विशेष पसंतीस उतरलेला जर कोणता शो असेल तर तो म्हणजे ‘जलवा’.
या शो मधील सगळ्याच कलाकारांचा ‘जलवा’ पाहून सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. आजवर रसिकांच्या सहकार्याने ‘जलवा’ या कार्यक्रमाचे एकूण ३०० प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचा ३०१ वा प्रयोग होणार आहे. उच्च प्रतीचे बहारदार नृत्याविष्कार, मानवी देखावे, विद्युत रोषणाई, भव्य दिव्य रंगमंच या कार्यक्रमामध्ये सर्वांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांसाठी प्रवेश मोफत असून या नृत्य सोहळ्याचा याची देही याची डोळा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर, सल्लागार सुनील भोगटे, निर्माते उद्योजक उमेश पाटील व सौ.स्वाती पाटील यांनी केले आहे.

चिमणी पाखरांचा नव्या घरट्यासाठी सर्वांनी हातभार लावावा – रवी कुडाळकर

२० वर्षांपूर्वी चिमणी पाखरं डान्स अकॅडमीची स्थापना झाली आणि जिल्ह्यातील चिमणी पाखरांना त्यांच्या हक्काचं घरटं मिळालं. या घरट्यानं चिमुकल्या पंखांना बळ देण्याचं काम केलं.  यातील अनेक चिमणी -  पाखरांनी त्यांच्या स्वप्नांच्या अवकाशात उत्तुंग भरारी मारली.

या कालावधीत अनेक चिमणी – पाखरं रुपेरी पडद्यावर झळकली. नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची संधी त्यांनी मिळाली.
या घरट्यातील पाखरं हळूहळू मोठी होऊ लागली आहेत. त्यामुळे या छोट्याशा घरट्यामध्ये या पाखरांना सामावून घेणं कठीण होत चाललं आहे. या सगळ्या चिमणी – पाखरांना एकाच घरट्यामध्ये राहता यावं या हेतूने एक मोठं घरटं बांधण्याचा आमचा मानस आहे. यासाठी चिमणी पाखरं डान्स अकॅडमीची स्वतंत्र इमारत उभारण्याचे आम्ही ठरवले आहे. यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला महत्त्वाचे आहे. ‘जलवा’ हा शो पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व कलाप्रेमींनी बक्षीसरुपी सहकार्य करून आमच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे आवाहन चिमणी पाखर डान्स अकॅडमी चे संचालक रवी कुडाळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page