बागायतदारांचा एल्गार
राजू शेट्टींचा शासनाला अल्टिमेटम:कर्जमाफी व हेक्टरी ५ लाख मदत न मिळाल्यास १२ मार्चला ओरोसवर धडक मोर्चा..
⚡देवगड ता.१८-:
कोकणच्या अर्थकारणाचा कणा मानला जाणारा आंबा, काजू व मत्स्य व्यवसाय सध्या अभूतपूर्व संकटात सापडला असून विशेषतः ‘कोकणचा राजा’ हापूस आंबा यंदा अस्मानी आणि सुल्तानी संकटाने होरपळून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी किमान ५ लाख रुपयांची तातडीची नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा येत्या १२ मार्च रोजी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.
देवगड येथे आयोजित आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या एल्गार मेळाव्यात बोलताना शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, यंदाचा आंबा हंगाम मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील तीव्र चढ-उतार, फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव आणि किटकनाशकांच्या वाढत्या खर्चामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. देवगडसह अनेक भागांत मोहोर करपल्याने उत्पादनात तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसला असून बुरशीजन्य रोग व तुडतुडे यांसारख्या कीड-रोगांनी बागायतदारांची कंबर मोडली आहे.
राज्यातील कृषी, फलोत्पादन व मत्स्य विभागाने आवश्यक उपाययोजना केवळ कागदोपत्री केल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, आंबा संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे व कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून तातडीने परिणामकारक उपाय सुचवणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात शेतकरी एकाकी पडला आहे. औषध कंपन्यांकडून विक्री होणाऱ्या किटकनाशके व बुरशीनाशकांच्या गुणवत्तेबाबतही कृषी विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोकणातील आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसाय हे येथील अर्थचक्राचे मुख्य आधारस्तंभ आहेत. या तिन्ही क्षेत्रांवर नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरतेचे सावट असल्याने संपूर्ण प्रदेशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पात आंबा उत्पादकांसाठी ठोस तरतूद करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी किंवा हेक्टरी किमान ५ लाख रुपयांची थेट आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यापुढील संकट टाळण्यासाठी देवगड येथे अत्याधुनिक आंबा संशोधन केंद्र उभारावे, बागायतदारांना मूळ किमतीत औषधे, खते व किटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामान, कीडनियंत्रण व बाजारभाव याबाबत तात्काळ माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशीही मागणी मेळाव्यातून करण्यात आली.
शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढून आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा देत शेट्टी यांनी कोकणातील बागायतदारांच्या न्यायासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
