दिवसा क्रिकेटचा थरार, रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी..
⚡कणकवली ता.१८-: तालुक्यातील हळवल परबवाडी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ यांच्यावतीने १९ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य ‘कलारंग महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिवसा क्रिकेट स्पर्धांचा थरार आणि रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असा दुहेरी आनंद या महोत्सवात अनुभवता येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
कणकवली तालुक्यातील हळवल परबवाडी येथील या मंडळामार्फत गेली २० वर्षे सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. यंदा मंडळाचे २१ वे वर्ष असल्याने विशेष उत्साहात ‘क्रीडारंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. दिवसभर गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धा रंगणार आहेत. रात्री क्रीडारंग महोत्सवाचा औपचारिक शुभारंभ होऊन बुवा सुजित परब व बुवा अखिलेश फाळके यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे.
शुक्रवार, २० ते रविवार, २२ फेब्रुवारी दरम्यान ‘एक तालुका, एक संघ’ या धर्तीवर कै. प्रमोद परब स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहे. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला असून रात्री ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी रात्री खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत गेली दोन दशके कार्यरत असलेल्या मंडळाच्या या उपक्रमास जिल्हावासीयांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
