⚡मालवण ता.१६-:
ओम नमः शिवाय… हर हर महादेव असा शिवनामाचा जप करीत सावरवाड येथील प्रसिद्ध स्फटीक शिवलिंग मंदिरात रविवारी मध्यरात्री रुद्रनाद फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री रुद्रराज यांनी साधकांसमवेत केलेली भस्म आरती हजारो शिवभक्तांनी अनुभवली. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भस्म आरतीच्या वेळी उपस्थितानी हर हर महादेव नामाचा जयघोष करत महाशिवरात्रीचा जागर केला.
सावरवाड येथील अलीकडे नव्याने बांधण्यात आलेल्या रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टच्या शिव मंदिरात गेले दोन दिवस महाशिवरात्री निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिव मंदिरात शनिवारपासून सुरु झालेल्या महाशिवरात्रीच्या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो शिव भक्तांनी भेट दिली. काल रविवारी शिव धारनेवर आधारीत अनेक यज्ञ आणि वेद पठण, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्र हे विधी पार पडले. रात्री भस्म आरती हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. या भस्म आरतीला सुमारे पाच हजार शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवली होती.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रुद्रनाद फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री रुद्रराज यांनी स्फटीक शिवलिंगासमोर साधकांसमवेत भस्म आरती करण्यास सुरुवात केली. शंखनाद, घंटानाद, डमरूनाद, झाँज, ढोलांचा गजर अशा वाद्यांच्या संगीतात व शिवनामाची ललकारी देत संपन्न झालेल्या या भस्मआरती कार्यक्रमात सारेच तल्लीन झाले. या भस्म आरतीच्या सांगतेनंतर ओम नमः शिवाय चा सकाळपर्यंत जप करण्यात आला. या उत्सवास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली.
