नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी..
⚡मालवण ता.१६-:
मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीनरी व टेक्निशियन पुरेशा प्रमाणात नसल्याने याठिकाणी डायलिसीससाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत असून अनेक रुग्णांना ओरोस येथे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात डायलिसीस मशीन व टेनक्निशियन वाढवावेत, अशी मागणी मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे केली. तसेच रुग्णालयातील डायलिसीस सुविधा व इतर आवश्यक सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी आपण आम. निलेश राणे यांचे लक्ष वेधू, असेही सौ. वराडकर यांनी सांगितले.
मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर यांनी आज मालवण ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन डायलिसीस सुविधेच्या कमतरतेबाबत डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयाच्या इतर विभागांची पाहाणी करून तेथील समस्या, कमतरता व आवश्यक सोयीची माहिती घेतली.
यावेळी नगराध्यक्ष सौ. वराडकर व सौ. पूनम चव्हाण यांनी रुग्णालयातील डायलिसीस सुविधा पुरेशी नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय मांडली. यावेळी उपस्थित टेक्निशियन कडून रुग्णालयात दोन डायलिसीस मशीन असून एक टेक्निशियन, दोन परिचारिका आहेत, दिवसाला दोन सत्रात चार रुग्णांचे डायलिसीस होत असून सध्या बारा रुग्ण असून सहा रुग्ण प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती देण्यात आली. यावर सौ. वराडकर यांनी रुग्ण प्रतीक्षेत असल्याने अनेकांना डायलिसीससाठी ओरोस येथे जावे लागत आहे, त्यामुळे आणखी दोन डायलिसीस मशीन रुग्णालयात बसविण्यात यावेत तसेच टेक्निशियन वाढवावेत अशी मागणी केली. याबाबत डॉ. पाटील यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. यावर नगराध्यक्ष सौ. वराडकर यांनी ज्यादा डायलिसीस मशीन साठी रुग्णालयाकडून मागणी पत्र आम्हाला द्यावे, याबाबत आम. निलेश राणे यांचे लक्ष वेधून आणखी डायलिसीस मशीन व आवश्यक टेक्निशियन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
तसेच रुग्णालयात गरोदर मातांच्या तपासणीसाठी सोनोग्राफी बंद असून रुग्णलयात आवश्यक स्त्रीरोग तज्ञझालं इतर डॉक्टर, कर्मचारी यांचीही कमतरता असल्याने या सर्व आवश्यक बाबींचीही माहिती द्यावी, त्याबाबतही आम. राणे यांचे लक्ष वेधू व रुग्णालयास आवश्यक ते सहकार्य करू असे यावेळी नगराध्यक्ष सौ. वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. पाटकर, सौ. पूनम चव्हाण व सौ. अश्विनी कांदळकर यांनी सांगितले.
