मोती तलाव परिसरात महिलां, बालकां व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा…

ॲड. सिद्धार्थ भांबुरे:नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच वेधले निवेदनद्वारे लक्ष..

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी येथील मोती तलाव परिसरात महिलां, बालकां व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, तसेच पावसाळ्यातही पर्यटकांना बसता यावे यासाठी शेड उभारण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मोती तलाव परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. महिलांबरोबर लहान मुलेही तलावाकाठी खेळत असतात. अनेक वेळा पालक मोबाईलवर व्यस्त असताना मुले तलावाच्या पाण्याकडे जातात, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सायंकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक येथे विरंगुळ्यासाठी बसत असतात. काही वेळा मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती तलावाकाठी येऊन बसतात किंवा झोपतात. यापूर्वी अशा प्रकारांतून दुर्दैवी घटना घडून नागरिकांचा जीवही गेला असल्याचे निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

तसेच पावसाळ्याच्या काळात तलाव परिसरात बसण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तलावाभोवती सुरक्षित अंतरावर आकर्षक रेलिंग बसविण्यात यावे. तसेच पर्यटक व नागरिकांना बसण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुशोभित शेड उभारण्यात याव्यात, जेणेकरून पावसाळ्यातही तलाव परिसराचा आनंद घेता येईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
या कामांसाठी येणाऱ्या आर्थिक अंदाजपत्रकात तरतूद करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही ॲड. भांबुरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page