‘जिवा माइन्स अँड मिनरल्स’वर ईडीची कारवाई…

⚡बांदा ता.१६-:
​गोव्यातील लोहखनिज खाणींच्या नावाखाली एका चिनी कंपनीला १३ कोटी ४२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘जिवा माइन्स अँड मिनरल्स लिमिटेड’ विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.
या फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील दोन भूखंड आणि मुंबईतील एक आलिशान फ्लॅट अशी एकूण २ कोटी २९ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे.
​हे प्रकरण २०१० मध्ये सुरू झाले होते, जेव्हा संशयितांनी चीनच्या एका कंपनीला खाणीत भागीदारी आणि लोहखनिज निर्यातीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही उत्खनन किंवा निर्यात झाली नाही. तपासात असे समोर आले की, हा पैसा अतिशय पद्धतशीरपणे स्वतःच्या फायद्यासाठी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवण्यात आला होता. गोवा आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ही कारवाई केली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर काही जमीन व्यवहारांचीही आता चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

You cannot copy content of this page