अदृश्य शक्तीचे नाव जाहीर करा …

माजी आमदार परशुराम उपरकर यांचे पालकमंत्र्यांना आव्हान.!

⚡कणकवली ता.११-: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप – प्रत्यारोपांना जोर चढला असून ठाकरे सेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पालकमंत्री जिल्हा परिषद निवडणुकीत अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचा उल्लेख करतात. जर त्यांच्यात खरोखरच हिंमत असेल तर त्या अदृश्य शक्तीचे नाव जाहीर करावे, असे खुले आव्हान उपरकर यांनी कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

लोकसभा निवडणुकीत ज्या अदृश्य शक्तीने एक हजार रुपये वाटल्याची चर्चा होती आणि मालवण विधानसभा निवडणुकीत तीन हजार रुपये वाटले गेले, तीच ही अदृश्य शक्ती आहे काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फोंडा आणि नेरूर येथे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारी हीच शक्ती आहे काय ? असेही त्यांनी विचारले.

जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या काही अपक्ष उमेदवारांकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेतले जात असल्याचेही उपरकर यांनी सांगितले. जर तसे असेल तर पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी आणि अदृश्य शक्तीमागील खरे चेहरे जनतेसमोर आणावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सिंधुदुर्ग हा बॅ. नाथ पै आणि मधु दंडवते यांसारख्या विचारवंतांचा जिल्हा आहे. मात्र आज विरोधी उमेदवार विकत घेऊन बिनविरोध सदस्य निवडून आणण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कणकवली विधानसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार विकत घेण्याची कुप्रथा पालकमंत्र्यांनी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांसारख्या बलाढ्य नेत्याला साध्या शिवसैनिकांनी पराभूत केले, हे विसरू नये. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक विकला जात नाही. जे उमेदवार विकले गेले ते आयाराम – गयाराम होते आणि त्यांचे राजकारणातील स्थान संपले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपा नेत्यांनी ठाकरे शिवसेना संपली असे म्हणू नये. ठाकरे यांचे शिवसैनिक पुन्हा जोमाने पेटून उठतील आणि नव्या उर्जेने संघटना उभी करतील, असा विश्वासही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page