राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेल्या उद्याच्या संपात भारतीय मजदूर संघ सहभागी नाही…

हरी चव्हाण:भारतीय मजदूर संघ केंद्र सरकारच्या चार श्रम संहितांचे स्वागत करते…

⚡मालवण ता.११-:
देशातील अन्य कामगार संघटनांनी व संयुक्त किसान मोर्चाने विरोधासाठी विरोध म्हणून राजकिय दृष्टीने प्रेरित असा १२ फेब्रुवारी रोजी संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा नसून, मजदूर संघ संपात सहभागीही होणार नाही. भारतीय मजदूर संघ, राजकीय प्रेरणेतून होणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी होत नाही. कारण कामगार क्षेत्राला राजकीय स्वार्थांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच कामगारांनी या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी केले आहे.

भारतीय मजदूर संघ केंद्र सरकारच्या चार श्रम संहितांचे स्वागत करते. तथापि त्यापैकी दोन संहिता मधील काही तरतुदीं विषयी मजदूर संघाने आपल्या हरकती व चिंता केंद्र सरकार जवळ व्यक्त केली आहे. मजदूर संघाने स्पष्ट केले आहे की, वेतन व सामाजिक सुरक्षा संहिता या ऐतिहासिक व क्रांतिकारी आहेत, तर उर्वरित दोन संहितां मधील काही तरतुदीं विषयी भारतीय मजदूर संघाला चिंता आहे. या सर्व मुद्यांवर १३ व २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय मजदूर संघ व केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांच्यात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर श्रम मंत्र्यांनी मजदूर संघाने मांडलेल्या हरकतींवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

याशिवाय भारतीय मजदूर संघाने कामगार क्षेत्राशी संबंधित इतर अनेक मागण्या सरकारसमोर मांडल्या असून, त्यावर योग्य विचार करून तोडगा काढण्याचे आश्वासन श्रम मंत्री मांडविया यांनी दिले असल्याची माहिती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दिली.

भारतीय मजदूर संघ सरकारच्या सकारात्मक व कामगार हितैषी धोरणांना सातत्याने पाठिंबा देत आला आहे. तसेच कामगारांच्या हितांच्या विरोधात असलेल्या धोरणांचा ठामपणे विरोध करून त्याबाबत आपल्या हरकती मांडत राहिला आहे. भारतीय मजदूर संघ राजकीय प्रेरणेतून होणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी होत नाही. कारण कामगार क्षेत्राला राजकीय स्वार्थां पासून दूर ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच मजदूर संघ व संलग्न संघटनांनी १२ फेब्रुवारीच्या राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेल्या संपाला पाठिंबा दिलेला नाही व त्यात सहभागी होणार नाही. तसेच या संपात कोणी कामगारांनी सहभागी होऊ नये असे आवाहन हरी चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page