मालवण नगरपालिकेच्या विषय समित्यांवर शिवसेना (शिंदे)–भाजपचे वर्चस्व…

मालवण,ता.११-: मालवण नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चारही समित्यांवर शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांचे वर्चस्व राहिले. यात पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर,
सार्वजनिक बांधकाम सभापती पदी सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर व उपासभापती पदी सौ. अश्विनी कांदळकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी पूनम चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी ही निवड जाहीर केली. या निवडीनंतर मालवण नगरपालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांमुळे पुढे ढकलण्यात आलेली मालवण नगरपालिका विषय समिती सभापती पदाची निवडणूक आज पिठासन अधिकारी मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका सभागृहात पार पडली. या निवडणुकीत सकाळच्या सत्रात शिंदे शिवसेना, भाजप आणि ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने विविध समिती सदस्यांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली तर दुपारी तीन वाजता सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली.

यात पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती हे पदसिद्ध पद उपनगराध्यक्ष यांच्याकडे असल्याने दीपक पाटकर यांची निवड जाहीर करण्यात आली. यात सदस्य म्हणून शर्वरी पाटकर, मेघा सावंत, ललित चव्हाण, तपस्वी मयेकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी सहदेव बापर्डेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यात सदस्य म्हणून मेघा सावंत, महेश कोयंडे, मंदार केणी, मंदार ओरसकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी पूनम चव्हाण यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सदस्य म्हणून सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, अनिता गिरकर यांची निवड जाहीर करण्यात आली. महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यात उपसभापती म्हणून अश्विनी कांदळकर, सदस्य म्हणून भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, अनिता गिरकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी नगरपालिकेची स्थायी समितीही गठीत करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष ममता वराडकर, उपाध्यक्ष दीपक पाटकर, सदस्य सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण, अन्वेशा आचरेकर यांचा समावेश आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नूतन सभापतींचे अभिनंदन करताना पाणी पुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यामध्ये गेल्या चार वर्षाच्या प्रशासकीय काळात निधीचा दुरुपयोग झाला आहे, त्यामुळे यापुढे निधीचा दुरुपयोग होऊ नये यां दृष्टीने नूतन समिती सभापती व सदस्यांनी चांगले काम करावे असे सांगितले. यावेळी महेश कांदळगावकर यांनीही यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या काळात योग्य कारभार झालेला नाही, त्यामुळे आता नगरपालिकेत चांगला कारभार होण्यासाठी सर्वांनी मिळून काम करूया, असे सांगितले. यावेळी नूतन आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी स्वच्छता व आरोग्य विभागात ज्या त्रुटी आहेत त्या दूर करू, निधी वाया जाणार नाही हे आपले ध्येय असेल, आपण सर्वाना सोबत घेऊन एकदिलाने काम करून मालवण शहर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवूया असे सांगितले. तर रविकिरण तोरसकर यांनी मालवण मधील पर्यटन लक्षात घेता पुढील काळात पर्यटन समितीही स्थापन करावी अशी सूचना मांडली. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित समिती सभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page