प्रशासनाच्या मदती पुर्वी शिवसेना पक्षामार्फत आर्थिक दुर्बल घटकांना तातडीने मदत करणार – पालकमंत्री उदय सामंत
*💫वैभववाडी दि.१९-:* वैभववाडी तालुक्यातील ‘तौक्ती’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावात भेट दिली व त्यानंतर ग्रामपंचायत नाधवडे येथे तालुक्यातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या वादळामध्ये वैभववाडी तालुक्यातील जवळ जवळ साडेसातशे घरांचे नुकसान होऊन शाळा व इतर नुकसान पाहता मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. आंबा, काजू , केळी व इतर बागायतदारांचे देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील या सर्व परिस्थितीचा आढावा घेवून तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके यांनी पंचनामा केला असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत वैभववाडी तालुक्यातील झालेल्या हानी बाबत खासदार विनायक राऊत व मी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती तसेच वादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यापूर्वी जो जी. आर काढला होता, तो आता पुन्हा काढून लाईव्ह करावा व सिंधुदुर्ग वासियांना तात्काळ मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही फक्त प्रशासनाच्या मदतीवर थांबलेलो नाही व नुसत्या मदतीची घोषणा देखील केलेल्या नसून प्रशासनाच्या मदतीला ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने आम्ही शिवसेनापक्षा मार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना पत्रे, ताडपत्री अशा आवश्यक साधनांची पूर्तता तात्काळ करणार असल्याचे सांगितले. ज्या गावांमध्ये नळपाणी योजना ठप्प झालेली आहे. त्या ठिकाणी तात्काळ जनरेटरची सोय उपलब्ध करून नळपाणी योजना सुरळीत सुरू करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आम्ही आमच्या पक्षा मार्फत मदत करायला सुरुवात देखील केली असल्याचे पालकमंत्री म्हणाले. त्याचा प्रत्यय आज संध्याकाळ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात होणार असल्याचे त्यांनी या आढावा बैठकीत सांगितले. या आढावा बैठकिला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रामदास झळके, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अतुल रावराणे, शिवसेना नेते संदेश पारकर व माजी उपसभापती बंड्या मांजरेकर इतर पदाधिकारी उपस्थित होते.
