पाणीटंचाई दूर : पंचायत समिती प्रशासनासह स्थानिकांनी मानले आभार..
⚡सावंतवाडी ता.११-:
शहरातील चितारआळी येथील सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विंधन विहीर (बोअरवेल) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शाळेसह परिसरातील पाण्याची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार असून, नार्वेकर कुटुंबीयांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विहिरीचे थाटात भूमीपूजन
या विंधन विहिरीचे भूमीपूजन सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मंदार नार्वेकर यांच्या मातोश्री श्रीमती कविता नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आले. यावेळी नार्वेकर कुटुंबीयांनी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी उद्योजक मनोज नार्वेकर, मंदार नार्वेकर, मनीषा नार्वेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, शांती सावंत, अंकिता काणेकर, ज्योती मुद्राळे, वैष्णवी मुद्राळे, बाबल वाडकर, महेश सुकी, चंद्रकांत नाईक, निलेश वेर्णेकर, राघू चितारी, प्रकाश पोतनीस, प्रकाश चितारी तसेच माठेकर व सावंत परिवारातील सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
भरपूर पाणीसाठा उपलब्ध
विशेष म्हणजे, विंधन विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून या विहिरीला भरपूर पाणीसाठा लागला आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या प्रांगणातच पाण्याचा हा स्त्रोत उपलब्ध झाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पंचायत समिती प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी नार्वेकर कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आहेत.
