शॉर्टसर्किटमुळे सर्वस्व जळून खाक:आर्थिक मदत करुन तिला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करण्याचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता.११-:
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील रहिवासी श्रीमती माळकर यांची मुलगी व लग्नानंतर फोंडा मडकी येथे वास्तव्यास असलेल्या सौ. विदिशा विशाल नाईक यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वडापावची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विदिशा नाईक यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नेहमीप्रमाणे सौ. विदिशा नाईक सकाळी आपल्या वडापावच्या टपरीवर गेल्या असताना, त्यांच्या घरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, संसारोपयोगी साहित्य यासह संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले.
इतकी भीषण आग होती की अंगावर घालायला एक कपडाही शिल्लक राहिला नाही.
या दुर्घटनेनंतर मंडई गावचे सरपंच तसेच काही मंत्री व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. सध्या विदिशा नाईक व त्यांचे कुटुंबीय मंदिरात आसरा घेऊन दिवस काढत आहेत, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.
या पार्श्वभूमीवर सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. सीताराम गावडे यांनी समाजातील आश्रयदाते, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व मंडळांना भावनिक आवाहन केले आहे की,
“सौ. विदिशा नाईक या कष्टकरी महिलेला सढळ हस्ते मदत करून तिला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करावे.”
💳 मदत करण्याचे आवाहन
नाव: विदिशा विशाल नाईक
बँक: कॅनरा बँक
खाते क्रमांक: ११64101017233
IFSC कोड: CNRB0001164
मदत केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट 8484827993 या क्रमांकावर पाठवावा, अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.
आज विदिशा नाईक यांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर मानवी सहवेदनेची आणि आधाराची नितांत गरज आहे.
एक छोटीशी मदतही त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा दिवा पेटवू शकते.
