मायकल डिसोजा यांचा आरोप: आकड्यांचे दावे करून कोणीही विजयी होत नाही, हे नऊ तारखेला निकाल कळेल..
⚡सावंतवाडी ता.०४-: कोलगाव मतदारसंघात झालेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून समोरच्या उमेदवारांनी विकासाच्या नावाखाली केवळ मलिदा खाण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप उमेदवार मायकल डिसोजा यांनी केला आहे.
जनता आता अशा लोकांना मतपेटीतून उत्तर देणार असून आकड्यांचे दावे करून कोणीही विजयी होत नाही, हे नऊ तारखेला निकालातून स्पष्ट होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मायकल डिसोजा पुढे म्हणाले की, माझे व्हिजन हे केवळ विकासावर आधारित आहे. मला कोणावरही वैयक्तिक आरोप करायचे नाहीत. कोलगाव मतदारसंघात आजही अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. निवडून आल्यानंतर ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
विकासकामे प्रामाणिकपणे केली असतील, तर मतदारांना पैसे वाटण्याची गरज का भासते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आजपर्यंत या मतदारसंघात हुकूमशाही, दादागिरी आणि मलिदा खाण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचा आरोप केला. त्यामुळे यावेळी मतदार सुज्ञ निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
