Headlines

भर बसस्थानकासमोर लोखंडी शेगेसह मारहाण

कणकवलीच्या कायदा – सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह:व्हायरल व्हिडिओमुळे शहरात खळबळ:उड्डाणपुलाखाली कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची नागरिकांची मागणी..

कणकवली : कणकवली शहरातील कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली छत्री दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने लोखंडी शेगेसारख्या वस्तूने धमकावत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बसस्थानक परिसरात दिवसभर प्रवासी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या मारहाणीसारखे प्रकार घडत असतील, तर सामान्य नागरिक कितपत सुरक्षित आहेत, असा संतप्त सवाल आता शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात बसस्थानक परिसर आणि उड्डाणपुलाखालील भागात विविध अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे या परिसरात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी किंवा होमगार्डची नियुक्ती करून नियमित गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच बसस्थानक परिसरात सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page