आश्वासन देणाऱ्यांना आता जागा दाखवा…

बाबुराव धुरी: तुम्ही मला एकदा हाक द्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी..

⚡दोडामार्ग ता.०३- :
माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून मतदारांनी कमळाला साथ दिली. मात्र त्या काळात दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली, याचा आता नागरिकांनी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव धुरी यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, आज या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चुकीच्या व्यक्तीला मतदान केल्यास पुढील पाच वर्षे त्याचे परिणाम सहन करावे लागतील. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवस मतदारांसाठी उपलब्ध असणाऱ्या माझ्यासारख्या उमेदवाराला केवळ एक तास द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांत नेमका किती विकास झाला, याचाही नागरिकांनी आत्मपरीक्षण करावे, असे सांगताना धुरी म्हणाले की, आज या भागातील तरुणांना शिक्षण व रोजगारासाठी गोव्यात जावे लागत आहे. स्थानिक पातळीवर आवश्यक सुविधा उपलब्ध नसताना अशा लोकप्रतिनिधींना पुन्हा पुन्हा का निवडून दिले जाते, याचाही विचार व्हायला हवा.

निवडणुकीच्या काळात काही मंडळी पैशांचे आमिष दाखवतात; मात्र निवडणूक संपल्यानंतर तीच मंडळी पुन्हा मतदारांना दिसत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघात सातत्याने काम करत असून, ३६५ दिवस जनतेसाठी उपलब्ध असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“तुम्ही मला एकदा हाक द्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी,” असे सांगत बाबुराव धुरी यांनी मंदिरात बसून शब्द देत असल्याचेही स्पष्ट केले. तसेच, सध्या वापरले जाणारे पैसे हे अनैतिक मार्गाने कमावलेले असून ते तात्पुरते असतात; मात्र अशा उमेदवारांची पुढील पाच वर्षे नागरिकांना काहीच मदत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यामुळे मतदारांनी आताच योग्य निर्णय घ्यावा आणि आपले मत ठरवावे, असे आवाहन बाबुराव धुरी यांनी उपस्थितांना केले.

You cannot copy content of this page