देवगडच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अजितदादांची अकाली एक्झिट मनाला चटका देणारी…

नंदकुमार घाटे:देवगड राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने शोकसभा ; विविध स्तरांतून श्रद्धांजली..

⚡देवगड ता ३०-:
देवगडच्या विकासप्रक्रियेत योगदान देणाऱ्या अजितदादांची अकाली एक्झिट ही मनाला चटका देणारी असून कार्यकर्त्यांशी व सर्वसामान्य जनतेशी आपुलकीने वागणारा, दिलदार, धुरंधर लोकनेत्याला मुकलो, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली.
अजितदादा पवार यांनी पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देऊन देवगडच्या विकासप्रक्रियेत मोठे योगदान दिले होते, याचा आवर्जून उल्लेख यावेळी घाटे यांनी करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
देवगड राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने शुक्रवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला देवगड तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमधून अनेकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
नंदकुमार घाटे यांनी अजितदादांबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, देवगडच्या विकासप्रक्रियेत अजितदादांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्यासाठी पत्र दिल्यानंतर त्यांनी त्या पत्राची तात्काळ दखल घेऊन निधी मंजूर केला व कामालाही तात्काळ सुरुवात झाली. आपल्या शब्दाला किंमत देणारा, कार्यकर्त्यांना आपुलकीने वागवणारा असा धुरंधर नेता आपण हरपला आहे. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली.
देवगड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अभय बापट यांनीही भावना व्यक्त केल्या. दिलेले काम तात्काळ करणारा, सर्वांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे अजितदादा पवार होते. प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. देवगडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्याबद्दल त्यांना कायम आदर होता. त्यामुळे घाटे यांनी दिलेल्या विकासकामांच्या पत्रांची ते तात्काळ दखल घेत आणि कामेही मार्गी लावत असत. कार्यकर्त्यांना सन्मान देणारा नेता हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. युद्धामध्ये राजा किंवा सेनापती धारातीर्थी पडल्यानंतर जसे सैन्याचे मनोबल खचते, तशीच स्थिती अजितदादांच्या निधनाने कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यांचे कार्य त्याच ताकदीने पुढे नेऊया, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी सुरेश सोनटक्के यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण अजितदादा होते. शरद पवार साहेबांकडे नेते होते, तर अजितदादांकडे कार्यकर्ते होते. कुटुंब नावाची संस्था त्यांनी जपली. बारामती शहरावर व तेथील लोकांवर त्यांचे नितांत प्रेम होते. त्यांनी जातीपातीच्या पलीकडील राजकारण केले, असे त्यांनी सांगितले.

दयानंद मांगले यांनी अजितदादा हे जनतेशी जवळीक साधणारे नेते होते, अशा शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली. प्रदीप मुणगेकर यांनी विकास करायचा असेल तर कायम बारामतीचे उदाहरण द्यावे लागते. असा विकास अजितदादा पवार यांनी केला होता. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. विलास रूमडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
या शोकसभेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, अभय बापट, राजेंद्र हिदळेकर, विजय जगताप, निलेश पेडणेकर, शरद शिंदे, सौ. पुनम कुबल, विजय कदम, सुधीर मांजरेकर, प्रसाद कुळकर्णी, शिवराम निकम, उदय रूमडे, गुरूनाथ वाडेकर, नागेश आचरेकर, सुहास नाणेरकर, शामकांत शेडगे, शेखर धुरी, ज्ञानदेव भडसाळे, सुभाष देवगडकर, शिवप्रसाद पेडणेकर, फटू मुणगेकर, तात्या वाळके, जयराम कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page