सुधाकर कवठणकर:ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन प्रचाराचा केला उत्साहात शुभारंभ…
⚡सावंतवाडी, ता.३०-: मागील पाच वर्षांत विद्यमान सदस्याने या भागात कोणतेही ठोस विकासकाम केलेले नाही. अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित असून, फक्त अमिष दाखवून मतं घेण्याचेच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे अशा लोकांना आता जनता चपराक देणार आहे, असा जोरदार हल्लाबोल जिल्हा परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुधाकर कवठणकर यांनी केला.
ते आरोंदा येथे महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
कवठणकर म्हणाले की, या भागातील अनेक विकासकामे रखडलेली असून आरोग्य व रोजगाराचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. निवडून आल्यानंतर नेत्यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी उपस्थित जनतेला दिला.
आपल्याला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही; मात्र गेल्या पाच वर्षांत कोणतीही ठोस कामे न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार आपण राणे यांचेच उमेदवार असल्याचा गैरसमज पसरवून मत वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा आता पक्षाशी कोणताही संबंध नसून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, असेही कवठणकर यांनी स्पष्ट केले.त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
यावेळी आरोंदा परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रचारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
