⚡वेंगुर्ला ता.२७-: सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सेवाकर्मी + पुरस्कार कार्यक्रमात नगर पंचायत/नगर परिषद गटात वेंगुर्ला नगरपरिषद (नगरपालिकेने) १०० पैकी १०० गुण मिळवित राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशामागे मुख्याधिकारी, अधिकारी -कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचे संयुक्त प्रयत्न योगदान असून, भविष्यातही नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा निर्धार मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी व्यक्त केला आहे. मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी गेल्या सुमारे एक वर्ष कार्यकालात नगरपरिषद व वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी चांगले कार्य केले आहे.
यामध्ये वेंगुर्ला नगरपरिषदसह रत्नागिरी, सिल्लोड, उदगीर इत्यादी 4 नगरपरिषदा, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ,पनवेल महानगरपालिका, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा) इत्यादी महाराष्ट्र राज्यातील एकूण 12 सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 26 जानेवारी रोजी 77 व्या प्रजासत्ताक दिनी राज्यस्तरावर या सेवाकर्मी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी यांनी समन्वय साधून काम केल्यास निश्चितच चांगले काम होते. मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी मागील वर्षभरात चांगले काम केले असून, यापुढेही यापेक्षाही चांगले काम करावे, असे यावेळी बोलताना नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी बोलताना स्पष्ट केले.वेंगुर्ला नगरपरिषदेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेला महाराष्ट्र शासनाचा सेवाकर्मी पुरस्कार जाहीर…
