जाधववाडी ग्रामस्थांचा ठाम इशारा..
⚡मालवण ता.२४-:
मालवण तालुक्यातील वायरी येथील जाधववाडी परिसरातील आचरेकर दुकान ते घारे पाणंद या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू न झाल्यास जाधववाडीवासीयांनी येत्या झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र खडीकरण व डांबरीकरणासाठी हा निधी अपुरा पडत असल्याने विद्यमान आमदार निलेश राणे यांनी आणखी ५ लाख रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर कामाची निविदाही मंजूर झाली; मात्र ठेकेदारांतील वादामुळे हे काम अर्धवट अवस्थेतच थांबले आहे.
सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून वाहनांची ये-जा जवळपास बंद झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही चालणे मुश्किल झाले असून एखादे वाहन आले तर जीव मुठीत धरून चालावे लागते, अशी परिस्थिती आहे. गेली पाच वर्षे सातत्याने रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही ठेकेदारांच्या श्रेयवादात हा रस्ता रखडलेला आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा यावर कोणताही ठोस अंकुश नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत जाधववाडीवासीयांनी जाहीर निषेध नोंदवला असून, येत्या दोन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास झेडपी व पंचायत समितीच्या मतदानावर पूर्ण बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन येत्या मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सर्व पक्षीय कार्यालयांना देण्यात येणार आहे.
दिनांक २ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान जाधववाडीचे उत्सव साजरे होणार असून, त्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. अन्यथा बहिष्काराचा निर्णय कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
