महायुतीत पूर्ण एकमत…

आ. निलेश राणे: जिल्हा परिषदेच्या सर्व ५० जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल..

कणकवली : खासदार नारायण राणे यांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणत त्यांचे एकमत घडवून आणले असून, त्यातूनच महायुतीची युती झाली आहे. अतिशय चांगल्या आणि सकारात्मक वातावरणात चर्चा पार पडली. जिल्हा परिषदेच्या सर्व ५० जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. आता आम्ही थेट जनतेच्या कोर्टात जाऊन त्यांच्याकडे पाठिंबा मागणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे यांनी ज्या कागदावर बोट ठेवले, तो निर्णय स्वीकारण्याच्या भूमिकेतूनच आम्ही सुरुवात केली आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यावर आम्ही पूर्णतः समाधानी आहोत. युती होण्यासाठी एकमत घडवून आणण्यात खासदार नारायण राणे यांनी मध्यस्थी केली असल्याने असमाधानाचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आ. निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांचे नगरसेवक कधी फुटतील, हे त्यांनाही कळणार नाही. जे काही चुकून निवडून आले आहेत, त्यांनी आधी स्वतःच्या नगरसेवकांकडे लक्ष द्यावे. जे सहाच नगरसेवक निवडून आले आहेत, ते कधी गायब होतील, याचा नेम नाही.

महापौर पदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, जो फॉर्म्युला ठरणार आहे, तो ज्येष्ठ नेते ठरवतील. शिवसेनेचा महापौर असावा, अशी मागणी करण्यात काहीही गैर नाही. कुठली शिवसेना डुप्लिकेट आहे, हे २०२४ च्या निवडणुकीत राज्यातील जनतेने स्पष्टपणे दाखवून दिले आहे. कितीही हातपाय आपटले तरी मनसेचा महापौर होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबईकरांनी डुप्लिकेट ठाकरे यांना बाजूला ठेवले असून, हे ठाकरेच डुप्लिकेट आहेत. त्यांच्या जवळ उरलेली सेना देखील डुप्लिकेट आहे. ओरिजिनल शिवसेना ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याचेही आमदार निलेश राणे यांनी ठामपणे सांगितले.

You cannot copy content of this page