रविकिरण तोरसकर यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन..
⚡मालवण ता.१७-:
जिल्ह्याच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी पारंपारिक मच्छिमारांकडून सातत्याने होत असताना मच्छिमार नेते व भाजपचे मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी निवती बंदर समोरील समुद्रात स्टिंग ऑपरेशन करून पर्ससीन मासेमारी बंदी कालावधी असतानाही सात ते आठ वाव समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारी नौका व्हिडीओच्या माध्यमातून निदर्शनास आणून प्रशासन व मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच अशा अनधिकृत मासेमारीला अभय मिळत असल्याचा आरोप करत सदर नौकेचा नंबरही खोडलेला असल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब असल्याचे तोरसकर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबाबत स्थानिक पारंपारिक मच्छिमारांकडून सातत्याने आवाज उठवून लढा दिला जात आहे. तसेच अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौका प्रशासन व मत्स्य विभागाच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणीही केली जाते. मात्र, लक्ष वेधले जात आहे. मात्र, मत्स्य विभागाकडून अपेक्षेप्रमाणे कारवाई होत नसल्याने मच्छिमारांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी निवती बंदर समोरील समुद्रात नौकेतून जात पर्ससीन मासेमारी करणाऱ्या एका नौकेचे छायाचित्रण करत स्टिंग ऑपरेशन करून कशाप्रकारे अनधिकृत मासेमारी होत आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे.
१ जानेवारी पासून पर्ससीन मासेमारी बंदी कालावधी सुरु झाला असतानाही निवती समोरील समुद्रात सात ते आठ वाव अंतरात पर्ससीन नौकेद्वारे मासेमारी सुरु होती. सदर नौकेचा नंबरही खोडण्यात आला होता. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अशा नौकाना मासेमारी करण्याची परवानगी मिळत आहे, असा आरोप रविकिरण तोरसकर यांनी केला. मत्स्योद्योग मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारी चालणार नाही असा आदेश देत कारवाईसाठी ड्रोन व्यवस्थाही उपलब्ध करून दिली. मात्र, ना. राणे यांच्या आदेशाला सरकारी अधिकारीच चॅलेंज देत असून ड्रोन व्यवस्था उपलब्ध करून देऊनही त्याचा वापर अधिकाऱ्यांना करायचा नाहीय असेही तोरसकर म्हणाले. सदर नौकेचा नंबरही खोडण्यात आल्याने अशा नौका सागरी सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. या सर्व गोष्टीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे यां अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई झालीच पाहिजे तसेच त्यांना अभय देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याचेही श्री. तोरसकर म्हणाले.
