⚡बांदा ता.१७-: येथील साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रकाशन आणि पुरस्कार सोहळा रविवारी दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता बांदा येथील श्री स्वामी समर्थ हॉल (बांदा दोडामार्ग रोड) येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात अच्युत पिळणकर लिखित श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज (परमपूज्य तेलंगणा) व बांदा बाल चरित्र ग्रंथ, तसेच कवयित्री स्व. सौ. अनुराधा (आशा) पिळणकर लिखित कविता व बडबड गीत संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवली येथील प्रसिद्ध कवी व स्तंभलेखक अजय कांडर हे असणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून लेखक तथा मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक (स्वरूप हॉस्पिटल, सावंतवाडी) येथील डॉ. अमुल पावसकर, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ. अमुल पावसकर यांना श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज स्मरणार्थ आश्रम पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, कवी अजय कांडर यांना कवयित्री स्व. सौ. आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवर व्यक्ती व संस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन अच्युत शांताराम पिळणकर व परिवार, डेगवे – बांदा यांच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बांद्यात उद्या ग्रंथ प्रकाशन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन…
