माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे ‘मी लाभार्थी’ अर्ज दाखल करण्याच्या तयारीत…

रत्नाकर जोशी यांचा पलटवार:
महायुती की समर्थक यामध्ये वेळ घालवण्याऐवजी वैभव नाईकांना जिल्हा परिषदेसाठी 50 उमेदवार तरी मिळतात काय याचा शोध घ्यावा..

⚡कुडाळ ता.१७-: आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर उबाठा पक्षाची जी अवस्था आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती माजी आमदार वैभव नाईक यांची असेल असे वाटत नाही, अशी टीका शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी यांनी केली आहे. स्वतःच्या राजकीय आत्मचिंतनासाठी सतरंजी पसरवायचीच झाली, तर ती भाजपात की शिंदेसेनेत, हा प्रश्न नाईक यांना पडला असणे साहजिक असल्याचेही त्यांनी म्हटले.

महायुतीतील मतभेदांचा फायदा घेत मालवण-कणकवलीत उबाठाला काही प्रमाणात यश मिळाले. एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसताना काही नगरसेवक निवडून आले; मात्र रोज रोज दिवाळी नसते, हे वैभव नाईक यांनी लक्षात घ्यावे, असा टोला जोशी यांनी लगावला.
शिंक्याचे तुटणार आणि आपले फावणार या राजकीय गणितात असलेल्या अनेक बोक्यांची सध्या पंचाईत झाल्याची टीकाही त्यांनी केली.

याच पार्श्वभूमीवर कणकवलीतील बैठक भाजपाची आहे की महायुतीची, याची चिंता वैभव नाईक यांना सतावत असल्याचे जोशी म्हणाले. मात्र ही बैठक नेमकी कोणाची आहे, हे महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते ठरवतील. बैठकीच्या हॉलचा मागचा दरवाजा टेहाळण्याची नाईक यांना काहीही गरज नसल्याचा टोमणाही त्यांनी मारला.

खासदार नारायण राणे हे राजकीयदृष्ट्या भाजपाचे खासदार असले, तरी संपूर्ण कोकणचे ते अनभिषिक्त नेते असल्याचे सांगत, कोकणातील महायुतीतील सर्व पक्ष व नेते हे खऱ्या अर्थाने राणेसमर्थकच असल्याचा अभिमान असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.
वैभव नाईक यांनी महायुती की समर्थक यामध्ये वेळ घालवण्याऐवजी, आपल्या उबाठा पक्षाला पंचायत समिती सोडाच, किमान जिल्हा परिषदेसाठी तरी पन्नास उमेदवार मिळतात का, याचा शोध घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या तरी नाईक यांना महायुती किंवा समर्थक यापैकी कुठूनही ‘मी लाभार्थी’ योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता नसल्याचेही जोशी यांनी ठामपणे सांगितले.

You cannot copy content of this page