बांदा शहरात पूरसदृश स्थिती: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..
⚡बांदा ता.१३-: तिलारीच्या बांदा उपकालव्याची साफसफाई व किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आल्याने बांदा शहरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले असून शेती, भाजीपाला, पिके, घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून तिलारी प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारावर जोरदार टीका होत आहे. काम सुरू असताना पाणी सोडण्याचा निर्णय कोणी व कोणत्या अधिकाराने घेतला, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच बांद्याचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत, “शेतकऱ्यांचे नुकसान होईल याची जाणीव असूनही पाणी सोडणे म्हणजे सरळसरळ अन्याय आहे. याला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडली.
श्री सावंत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पूर्वसूचना देण्याची ठोस यंत्रणा राबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून, तात्काळ भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
