ग्रापं सदस्य साईप्रसाद काणेकर यांची मागणी..
⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बांदा ग्रामपंचायत कार्यालयातील फरशा अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून याबाबत ग्रामपंचायतीकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केला आहे. नागरिक, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच फरशा फुटलेल्या असल्याने कार्यालयाच्या सुरक्षिततेसह ग्रामपंचायतीच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुशोभीकरणाच्या कामात या नवीन फरशा बसविण्यात येणार होत्या. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. ही स्थिती पाहून गावाची लाज वाटते, असे मत काणेकर यांनी व्यक्त केले.
या पार्श्वभूमीवर येत्या २६ जानेवारीपर्यंत फरशा नवीन न बसविल्यास उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून स्वखर्चाने त्या फरशा बसवून देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
दरम्यान, बांदा येथे नुकत्याच दोन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकाऱ्यांनी करू नये, असेही श्री काणेकर यांनी स्पष्ट केले. ही कामे तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर होऊन ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करण्यात आली असून त्याचे राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ याबाबत निर्णय घेऊन फरशा बसवाव्यात, अन्यथा जनतेच्या हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी मिलिंद सावंत, निखिल मयेकर, आत्माराम बांदेकर आदी उपस्थित होते.
